हवेलीत जिल्हा परिषदेच्या ६ गटांची प्रारुप रचना प्रसिद्ध! पूर्व हवेलीत गट रचनेमुळे महायुतीची शक्यता मावळणार…

जयदिप जाधव
उरुळीकांचन: मिनी विधानसभेची रंगीत तालिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या प्रभाग प्रारुप यादी आज जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार हवेली तालुक्यात पूर्वीचे १३ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणांचे अस्तित्व संपुष्टात आले असून संपूर्ण हवेली तालुका मिळून ६ जिल्हा परिषद व १२ पंचायत समिती गण अस्तित्वात आले आहे.
पूर्वीच्या जिल्हा परिषद गटांत मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले असून पूर्व हवेली तालुक्यात ५ गट अस्तित्वात आले आहेत. अडीच वर्षापूर्वीच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर २०२५ ते २०३० या कालावधीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रारुप रचना सोमवार (दि.१४ ) प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पूर्व हवेलीत लोणीकंद -पेरणे जिल्हा परिषद गट अस्तित्वात आला आहे. तर जुना लोणीकंद – वाडेबोल्हाई गट विभागून वाडेबोल्हाई – कोरेगावमूळ हा जिल्हा परिषद गट अस्तित्वात आला आहे. पूर्वीचा उरुळीकांचन -सोरतापवाडी गट जिल्हा परिषद गट तसाच अस्तित्वात राहिला असून त्यातील कोरेगावमूळ, पेठ, प्रयागधाम ही गावे वगळण्यात आली आहे.
पूर्वीचा लोणीकाळभोर – थेऊर जिल्हा परिषद गटाचे विसर्जन होऊन लोणीकाळभोर – कुंजीरवाडी गट अस्तित्वात आला आहे. तर कदमवाकवस्ती गटातून फुरसुंगी – उरुळीदेवाची या गावांचा सामावेश नगरपरिषदेत झाल्याने कदमवाकवस्ती – थेऊर जिल्हा परिषद गट अस्तित्वात आला आहे. तर पश्चिम हवेलीत खेड शिवापूर – खानापूर हा एकच जिल्हा परिषद गट तयार झाला आहे.
दरम्यान पूर्व हवेलीत आमदार ज्ञानेश्वर कटके व जिल्हा बॅकेचे संचालक प्रदिप कंद यांच्या प्रभावक्षेत्रातील गावे एकाच गटात म्हणजे लोणीकंद -पेरणे गटात आली आहे. तर प्रदिप कंद यांचा संपूर्ण प्रभाव असलेला वाडेबोल्हाई – कोरेगावमूळ जिल्हा परिषद गट अस्तित्वात आला आहे. तर पुणे-सोलापूर रस्त्यालगतच्या उरुळीकांचन – सोरतापवाडी गटात राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गट यांना समान संधी असणार आहे. लोणीकाळभोर – कुंजीरवाडी गटात राष्ट्रवादी (अजित पवार गट ) व राष्ट्रवादी (शरद पवार गट ) यांना समान संधी असणार आहे. उर्वरीत कदमवाकवस्ती – थेऊर जिल्हापरिषद गटात भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
पूर्व हवेली तालुक्यात संभाव्य प्रारुप जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण रचनेत सध्यातरी सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजप यांच्यात वाटाघाटी होण्याची शक्यता फार कमी असून जिल्हा व राज्यपातळीवर महायुतीच्या युतीच्या निर्णयाकडे स्थानिक इच्छुकांचे डोळे लागले आहेत. प्रारुप रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती मांडण्यात येणार आहेत.