पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध ठिकाणाचे नाव बदलण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली मागणी…

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी विनंती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला केली आहे.
तसेच पुणे शहरातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज नगर नाव देण्यात यावे. या मागणीसाठी २४ जून २०२४ रोजी शिवप्रेमी संघटनांच्या वतीने पदयात्रा आणि मोर्चे काढण्यात आले होते.
त्यावेळी मेट्रो अधिकाऱ्यांनी नामांतराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. असा औचित्याचा मुद्दा सभागृहात विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी मांडला.
यावेळी पीठासीन अधिकारी असलेल्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, शिवाजीनगर हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात असून, सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.
येथे अनेक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर राहतात. या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नाव देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शिवाजीनगर परिसराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्यात यावे, अशी शासनाला विनंती केली.
दरम्यान, राज्यात अनेक शहरांची, ठिकाणांनी नावे बदलण्यात आली आहे. अशातच आता पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी विनंती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.