डीजेचा कर्कश आवाज, नाका-कानातून रक्त, अन् २३ वर्षीय तरुणाने गमावला जीव, नाशिकमध्ये धक्कादायक घटना….

नाशिक : नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला डीजेच्या दणदणाटामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नितीन फकिरा रणशिंगे असं मृत तरुणाचं नाव आहे. नाशिकच्या पेठरोवरील फुलेनगर परिसरात काल (ता.१३) एप्रिलला रात्रीच्या वेळी ही घटना घडली. डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्याने मृत्यू झाल्याची पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू हकीकतमध्ये नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, हा तरूण एका जयंती कार्यक्रमात सहभागी झाला होता. मिरवणुकीच्या कार्यक्रमात डीजे सुरू असताना अचानक त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान त्याचा मृत्यू डीजेच्या आवाजाने झाला की, आरोग्याच्या इतर कारणामुळे हे त्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान त्याला क्षयरोगाचाही त्रास होता अशी माहिती दिली जात आहे.