डीजे,फटाकेसह लेझर लाईटवर बंदी, ढोल- ताशा अन…. पुणे पोलिसांकडून विसर्जन मिरवणुकीसाठी नियमावली जारी

पुणे : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहर पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

यंदा गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्वाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पुढीलप्रमाणे..

ध्वनिवर्धक : रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी.

ज्वालाग्राही पदार्थ : मिरवणुकीत वापरास सक्त मनाई.
आवाजाची पातळी : ‘साउंड सिस्टीम’ लावताना डेसिबल मर्यादांचे पालन बंधनकारक.
लेजर लाइटवर बंदी : डोळ्यांना होणारी इजा टाळण्यासाठी लेजर लाइटवर बंदी.
फटाके : सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालय परिसरात फटाक्यांवर बंदी.
ढोल ताशा पथक : गणेश मंडळास दोन ढोल ताशा पथकांनाच परवानगी. एकूण ६० वादकांची मर्यादा, स्थिर वादन करण्यास बंदी.
कायदेशीर कारवाई : आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार.
दरम्यान जारी केलेल्याआदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिस पूर्णपणे सज्ज झाले आहेत.उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणारी विसर्जन मिरवणूक परवा दिवशी दुपारपर्यंत सुरू राहील. या कालावधीत सुमारे आठ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी,अंमलदार आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.
या मिरवणुकीवर मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त, पोलिस सह आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच, गुन्हे शाखेसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दल (क्यूआरटी) आणि केंद्र आणि राज्य राखीव पोलिस दलाची पथके मिरवणुकीदरम्यान सतत गस्त घालणार आहेत.
