राज्यातील भाजप नेत्यांची दिवाळी! ६ कारखान्यांना मिळाले कर्ज, आता तरी शेतकऱ्यांना बिले मिळणार का.?

पुणे : राज्यातील भाजप नेत्यांच्या कारखान्यांना केंद्र सरकारने मोठी मदत केल्याचे समोर आले आहे. सहा सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्य शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी ५४९ कोटी ५४ लाख रुपयांचे मार्जिन मनी कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

यामुळे आता या शेतकऱ्यांना बिले मिळण्यास मदत होणार आहे. यामध्ये माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माळशिरस अकलूज येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्यास ११३ कोटी ४२ लाख रुपये, भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा-किल्लारी येथील जि. लातूर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास ५० कोटी देण्यात आले आहेत.
तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या टाकळी सिकंदर-मोहोळ जि. सोलापूर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यास १२६ कोटी ३८ लाख रुपये, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील २ साखर कारखान्यांना कर्ज मंजूर झाले आहे.

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यास १५० कोटी रुपये, तसेच निरा-भीमा सहकारीस ७५ कोटी आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन जि. जालना येथील श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्यास ३४ कोटी ७४ लाख मिळणार आहेत.
दरम्यान, ज्या उद्देशासाठी अर्थसाहाय्य दिले आहे, त्यासाठी जर वापर केला गेला नाही तर एनसीडीसी, राज्य सरकार कर्ज बंद करण्याचा व वसूल करण्याचा अधिकार असेल, अशीही अट सरकारने लावली आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातील अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना अजून बिले दिली नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे आता तरी पैसे मिळणार का.? असा प्रश्न निर्माण झाला आहे.