शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी ; एकनाथ शिंदेंचे शिलेदार बैठकीवर बहिष्कार टाकून मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण काय?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू झालं आहे.गेल्या काही महिन्यांत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री वेगवेगळ्या कारणावरून नाराज झाल्याचे समोर आले आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सर्वच मंत्र्यांनी थेट बहिष्काराचं अस्त्र उगारलं आहे. शिंदेंच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर थेट बहिष्कार घातला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासूनच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्यांमध्ये निधीवाटपावरून प्रचंड नाराजी आहे. आज (18 नोव्हेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीला सामान्यत: सरकारमधील सर्वच मंत्री उपस्थित असतात. परंतु आजच्या बैठकीला शिंदेंचे सर्वच मंत्री अनुपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेचे फक्त एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते. सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र शिवसेनेचा एकही मंत्री बैठकीला नसल्यामळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान कल्याण डोंबीवलीच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. राज्यभरात भाजपात होत असलेल्या अशाच इन्कमिंगमुळे शिवसेनेत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. यामुळेदेखील शिंदे यांचे मंत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
