शिर्डीत महास्फोट! ‘भोंदू’ खरातचे थेट आरटीओ कनेक्शन; दोन बड्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, १०० खात्यांचे बिंग फुटणार…


शिर्डी : शिर्डीतील बहुचर्चित आर्थिक फसवणूक आणि सावकारकी प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भोंदू बाबा अशोक खरात यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या समता पतसंस्थेतील गैरव्यवहाराचे धागेदोरे आता थेट सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात परिवहन विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पुढे आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिर्डी पोलीस या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याच्या तयारीत असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भोंदू बाबा अशोक खरात याने आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अनेकांना ओढल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता या गुन्ह्यात परिवहन विभागातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समता पतसंस्थेत उघडण्यात आलेल्या १०० हून अधिक संशयास्पद खात्यांची तपासणी करताना पोलिसांना संबंधित अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची कागदपत्रे आढळल्याचे समजते. या महत्त्वाच्या धाग्यांमुळे शिर्डी पोलिसांच्या तपासाला आता नवी दिशा मिळाली असून प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत चालले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या नावे पतसंस्थेत खाती उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही खाती त्यांनी स्वतः उघडली की त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून अशोक खरातने बनावट खाती तयार केली, याचा छडा लावणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

जर ही खाती बनावट असल्याचे निष्पन्न झाले, तर या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची वैयक्तिक कागदपत्रे एका भोंदू बाबापर्यंत पोहोचली कशी, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या नव्या घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गूढ बनले असून तपास यंत्रणांसमोर अनेक अनुत्तरित प्रश्न उभे राहिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!