विकासाचा डिजिटल पॅटर्न! पुणे महापालिकेत 22 वर्षीय सई थोपटेसह या तरुण शिलेदारांची एन्ट्री

पुणे : सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांनी यंदा शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. पुण्यातील सहकारनगर पद्मावती प्रभाग क्रमांक 36 मधून अवघ्या 22 वर्षीय सई थोपटे या विजयी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड मधील वार्ड क्रमांक एक मधून यश साने विजयी ठरले आहेत. या तरुण शिलेदारांनी आता शहराच्या विकासाचा डिजिटल पॅटर्न राबवला आहे.

पुण्याच्या महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सई थोपटे यांनी नागरी समस्या सोडवण्यासाठी आधुनिक उपाययोजना, प्रशासनात पारदर्शकता आणि डिजिटल माध्यमांचा वापर या मुद्द्यांवर भर दिला आहे.पिंपरी-चिंचवडमधील वॉर्ड क्रमांक 1 मधून विजयी झालेल्या यश साने यांनी सीसीटीव्ही देखरेख, महिला पोलिस ठाणे आणि सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे यांना प्राधान्य दिले आहे.
त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आधुनिक हॉल आणि भरती केंद्र, प्रभागनिहाय कचरा प्रक्रिया प्रकल्प, अखंड पाणीपुरवठा, पाईपद्वारे गॅस कनेक्शन, संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे, सरकारी इमारतींमध्ये सौर ऊर्जेचा वापर आणि नागरिकांशी नियमित संवाद अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.

दरम्यान जनरेशन झेडमधील तरुण उमेदवारांनी या निवडणुकीत ठसा उमटवत थेट नगरसेवकपदाची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या रेझ्युमेमध्ये आता नगरसेवक हा मानाचा शब्द जोडला गेला आहे. या तरुण शिलेदारांच्या एन्ट्रीने पुण्यासह पिंपरी चिंचवडचा विकास वेगाने होणार आहे.ऊर्जा, कल्पकता आणि आधुनिक दृष्टिकोनाच्या जोरावर हे नवे नेतृत्व शहरांच्या कारभारात सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
