पुणेकरांनो लक्ष द्या! तुम्हालाही आला मेसेज? लायसन्स निलंबित होणार? १९ लाख वाहनचालकांवर टांगती तलवार..


पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि दंड थकविणाऱ्या वाहनधारकांसाठी आता धोक्याची घंटा वाजली आहे. शहर वाहतूक शाखेने थकीत दंड वसुलीसाठी कंबर कसली असून, सुमारे १९ लाख प्रलंबित चलन आणि ४०० कोटी रुपयांच्या थकीत दंडासाठी आता थेट ‘लायसन्स निलंबना’चे हत्यार उपसले आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत थकीत दंड असलेल्या वाहनधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर नोटीस पाठवण्यात येणार आहे. या अधिकृत कोडवरूनच हे एसएमएस येतील. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम न भरल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ३० दिवसांच्या मुदतीत दंड न भरल्यास संबंधित चालकाचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. संबंधित प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात येईल, ज्यामुळे वाहनधारकांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.

नोटीस पाठवण्याच्या या प्रक्रियेत सायबर भामटे नागरिकांची फसवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार, पोलीस कधीही APK फाईल पाठवत नाहीत, ती डाउनलोड करू नका. कोणालाही आपला OTP शेअर करू नका. तसंच केवळ अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरूनच दंड भरावा. संशयास्पद मेसेज आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!