एकनाथ खडसेंच्या जावयाने खरंच ड्रग्ज घेतले? वैद्यकीय तपासणीतून धक्कादायक माहिती समोर…

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात काल (शनिवारी) रात्री एका फ्लॅटवर सुरु असलेली रेव्ह पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावली. यावेळी पोलिसांकडून चार पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये दोन तरुणींचा देखील समावेश आहे. छापेमारीत पोलिसांना घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हुक्का साहित्य आणि मद्य आढळल्याची माहिती मिळाली आहे.
पण खरंच या पार्टीत अमली पदार्थांचा वापर झाला का? एकनाथ खडसे यांच्या जावयाने ड्रग्ज घेतले का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सातही जणांची वैद्यकीय चाचणी केली आहे. या चाचणीचा आता अहवाल समोर आला आहे.
ज्यात सातपैकी दोघांच्या रक्तात अल्कोहोल अर्थात दारुची मात्रा आढळली आहे. मात्र सातपैकी कुणीही ड्रग्जचं सेवन केल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं नाही. त्यामुळे ही खरंच रेव्ह पार्टी होती की मद्य पार्टी? याबाबत संशय निर्माण होताना दिसत आहे.
शनिवारी रात्री उशिरा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं खराडी परिसरातील उच्चभ्रू परिसरात छापेमारी केली होती. या पार्टीच्या ठिकाणावरून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं होतं. आता या सातही जणांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.
दरम्यान, वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात ७ पैकी २ जणांनी अल्कोहोलच सेवन केल्याची माहिती समोर आहे. आता सर्वांचे रक्ताचे आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.