खोदकाम करताना मजूराची झाली दिवाळी!! सापडले तब्ब्ल ‘इतक्या’ लाखांचे हिरे, नेमकं घडलं काय?

मध्य प्रदेश : कधी कुणाचे नशीब चमकेल काही सांगता येत नाही. मध्य प्रदेशातील छतरपूर येथील काटिया या छोट्याशा गावात राहणाऱ्या हरगोविंद यादव आणि त्यांची पत्नीचे नशीब अचानक चमकले आहे.
काटिया गावात राहणारे हरगोविंद यादव आणि त्यांची पत्नी पवन देवी यादव हे दाम्पत्य गेल्या पाच वर्षांपासून हिरे मिळवण्यासाठी खाणीमध्ये कष्ट करत होते. आणि अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळालं. खोदकाम करत असताना त्यांना एक-दोन नव्हे तर चक्क आठ हिरे सापडले.
तसेच या हिऱ्यांपैकी काही उच्च दर्जाचे असून उर्वरित मध्यम ते सामान्य गुणवत्तेचे आहेत. यामुळे हे दाम्पत्य आता एका झटक्यात श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे. एकूण मिळालेल्या हिऱ्यांची किंमत अंदाजे १० ते १२ लाख रुपये, किंवा कदाचित त्याहून अधिक असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, हे हरगोविंद यादव यांच्या कुटुंबात पहिल्यांदाच घडत नाही. काही वर्षांपूर्वी त्यांच्या धाकट्या भावालाही एक हिरा सापडला होता. मात्र त्यावेळी माहितीअभावी आणि घाईने त्याने तो फक्त एक लाख रुपयांना विकला होता, जरी त्याची खरी किंमत अडीच ते तीन लाख रुपये होती.
त्यामुळे त्यावेळी त्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं. यावेळी मात्र हरगोविंद यांनी काळजीपूर्वक निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे दाम्पत्य जमीन खोदत होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाणीत काम करत, त्यांनी कधीही हार मानली नाही. गरिबी, दारिद्र्य, आणि कष्ट यांच्या कुशीवर वाढलेलं हे आयुष्य अचानक एका रात्रीत उजळलं आहे. या आठ हिऱ्यांमुळे त्यांचे आयुष्य बदलणार आहे, हे निश्चित.