बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ नावाचं वादळ, १३ व्या दिवशी कमावला मोठा गल्ला, ‘पुष्पा २’चा रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास…

पुणे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या आदित्य धरच्या ‘धुरंधर’ने सगळे रेकॉर्ड्स तोडण्याचं ठरवलं आहे. अवघ्या १२-१३ दिवसांत चित्रपटाने प्रचंड कमाई केली असून, माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर पिक्चर चांगला सुरू असून त्याची घोडदौड दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. या चित्रपटाचं खूप कौतुक होत आहे.

‘धुरंधर’ रीलिज होऊन केवळ १३ दिवस झाले आहेत आणि या १३ दिवसात रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या सिनेमा आता ४५० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रदर्शनाच्या १३ व्या दिवशी म्हणजे काल बुधवार १७ डिसेंबर रोजी या चित्रपटाने २५.५० कोटी रुपयांची कमाई करत नवा विक्रम केला आहे. ट्रेड ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, १३ व्या दिवसाच्या कमाईसह चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता ४३७.२५ कोटींपेक्षा अधिक झाले आहे.

चित्रपटाने पहिल्या वीकेंडला जबरदस्त ओपनिंग करत एकूण १०३ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी २८ कोटी, शनिवारी ३२ कोटी आणि रविवारी ४३ कोटी कमावले. त्यानंतर सोमवारी २३.२५ कोटी, मंगळवारी २७ कोटीसह एकूण कमाई १५० कोटींच्या पुढे गेली. बुधवार आणि गुरुवारी प्रत्येकी २७ कोटी कमावत पहिल्या आठवड्याची एकूण कमाई २०७.२५ कोटी रुपये झाली.

यानंतर दुसऱ्या वीकेंडलाही ‘धुरंधर’ची कमाई दमदार राहिली. शुक्रवारी ३२.५ कोटी, शनिवारी ५३ कोटी आणि रविवारी ५८ कोटी रुपये कमावले. यानंतर सोमवारी ३०.५ कोटी, मंगळवारी ३० कोटी आणि बुधवारी २५.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यामुळे चित्रपटाची एकूण कमाई थेट ४३७.२५ कोटी रुपयांवर पोहोचली. ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर बजेट वसुल तर केलेच आहे, शिवाय जबरदस्त नफाही कमावला. अशीच घोडदौड सुरू झाल्यास येत्या २ किंवा ३ दिवसात ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री होईल.
‘धुरंधर’ हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात दुसऱ्या आठवड्यात २०० कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ‘पुष्पा २’च्या नावावर होता, ज्याने दुसऱ्या आठवड्यात १९९ कोटी रुपये कमावले होते. विशेष म्हणजे, धुरंधरने हा टप्पा अवघ्या ५ दिवसांत पार केला आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या यशाचे वर्णन ‘अविश्वसनीय’ असे केले आहे.
