धुलिवंदनासाठी इथे होते जावयांची गाढवावरून मिरवणूक ! गाढवावरुन मिरवणूक होईल म्हणून २०० जावई भूमिगत ..जाणून घ्या गावाची परंपरा…!

केज : जावई म्हटले की मानपान… लाड आणि सरबराई ओघाने आलीच; पण बीड जिल्ह्यात एक गाव असेही आहे जेथे धुळवडीला जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते. केज तालुक्यातील विडा या गावाने ९० वर्षांपासून ही परंपरा जपली आहे. दरम्यान आज (ता.7) धूलिवंदन असल्याने जावयाच्या शोधत तरुणांची पथके मार्गस्थ झाली आहेत. दरम्यान, गावात स्थायिक असलेले २०० जावई भूमिगत झाले आहेत. त्यामुळे कोणत्या जावयांची गर्दभ सवारी निघणार, याकडे लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्यातील विडा हे ७ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाच्या वेशीजवळ दक्षिणमुखी हनुमान मंदिर असून गावात साधू शिव रामपुरी महाराजांची संजीवन समाधी आहे. या गावाने मध्ययुगीन संस्कृतीचे दर्शन घडवणा-या लळीत नाट्याची परंपरा १०० वर्षांपासून जपली आहे. निझाम काळात गावाला जहागिरी होती. १९१५ साली जहागीरदार तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांचे चिंचोली (ब) (जि. लातूर) येथील मेव्हणे धूलिवंदनाच्या दिवशी सासुरवाडीत आले होते. त्यावेळी परंपरेप्रमाणे भांग पिऊन थट्टामस्करी सुरू झाली. मस्करीतून जावयाची गाढवावर बसून सवारी काढली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली.
परंपरा कायम ठेवण्यासाठी धुळवडीच्या दोन दिवस अगोदर गावातील तरुण एकत्र येऊन जावई शोध समिती नेमतात. एका जावयास ताब्यात घेऊन धुळवडीपर्यत निगरानीखाली ठेवले जाते. धुळवडीच्या दिवशी सकाळी ग्रामपंचायतीसमोर गाढव आणून चपलेचा हार घालून मिरवणुकीला सुरुवात होते. गावातील प्रमुख रस्त्यांवरून दुपारपर्यंत मिरवणूक हनुमान मंदिरासमोर पोचते. या ठिकाणी लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते जावयाला दिला जातो. शिवाय जावईबापूला सास-याच्या ऐपतीनुसार सोन्याची अंगठी भेट दिली जाते.

- गावात एकोपा व सलोखा
जावयाची गाढवावरून मिरवणूक हा अपमानाचा प्रकार वाटतो. परंतु ही गावाची परंपरा मानून आजपर्यंत मिरवणुकीत कधीही भांडण झाले नाही. अगदी मुस्लिम धर्मातील सादेक कुरेशी यांनाही या मिरवणुकीचा मान मिळाला आहे.
- तीन पिढ्यांना मिळाला मान
गावातील सासरे, त्यांचेही जावई आणि पुन्हा त्यांचेही जावई अशा चौघांना हा मान मिळालेला आहे. दिवंगत देवराव मस्कर यांना मान मिळाला होता. त्यांच्या मुली गावातील चंद्रसेन पवार व महादेव पवार यांना दिलेल्या आहेत. हे दोन्ही पवार जावयांची मिरवणूक निघाली होती. महादेव पवार यांची मुलगीही गावातील अंगद देठे यांना दिली आहे. देठे यांचीही मिरवणूक निघाली. घोरपडे यांचे जावई एकनाथ पवार व त्यांचे जावई महादेव घोरपडे यांनाही मान मिळाला आहे.