धुळे हादरलं! कुटुंब बाहेर गेलं अन् घरात माजी स्थायी समिती सभापतीच्या लेकाने आयुष्य संपवलं, वाढदिवस साजरा केला अन्…,घटनेने खळबळ

धुळे : धुळे शहरातील स्नेहनगर भागात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. धुळे महानगर पालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज सोनल शिंदे याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना गुरुवारी (ता.११) रात्री उशिरा उघडकीस आली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मंगळवारीच (९ सप्टेंबर) विराजचा वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत आनंदात साजरा करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याच्या अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, विराजने आपल्या आयुष्याची अखेर केली त्या दिवशी तो घरी एकटाच होता. कुटुंबीय बाहेर गेलेले असताना त्याने घरात गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. काही वेळानंतर जेव्हा कुटुंबीय घरी परतले, तेव्हा त्यांना हा प्रकार लक्षात आला.

लेकाला गळफास घेतलेलं पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ विराजला खाली उतरवलं आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला होता.
रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणीअंती विराजचा मृत्यू आधीच झाल्याचे घोषित केले आणि कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. विराजने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, त्याच्या या निर्णयाच्या कारणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, विराज शिंदेच्या मृत्यूने धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे.
