धनुभाऊ माझ्या अंगावर गाडी घालणार! अजितदादा दूर राहा, मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवी मुंबईत पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या अंगावर गाडी घालण्याची सुपारी धनंजय मुंडेंनी दिल्याचा धक्कादायक दावा केला आहे. यापूर्वीही काही आरोपींनी पोलिस चौकशीत मुंडे यांचे नाव घेतल्याचे सांगत जरांगेंनी सरकार आणि पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
यासंदर्भात जरांगेंनी स्पष्ट केलं की, माझ्या कोर्टात सिद्ध झालंय, धनंजय मुंडे यांनी 2.5 कोटींची सुपारी दिली आहे. माझ्या हत्येचा कट रचला आहे.” इतकंच नव्हे तर ते यासाठी नार्को टेस्टसाठीही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी आणि धनंजय मुंडे दोघांची नार्को टेस्ट करा, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत जरांगेंनी धनंजय मुंडेंना थेट ‘धनुभाऊ’ असे संबोधित करत गंभीर आरोप केले आहेत. “धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव आहे. त्यांनी मैदानात यावं, मी तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही इशारा दिला. अजितदादा, या पापात सहभागी होऊ नका, अन्यथा मोठं नुकसान होईल, असे त्यांनी म्हटले. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. पहिले फडणवीस तसे नव्हते, ते क्रूर माणसांना सांभाळत आहेत. ते पुन्हा पूर्वीसारखे वागले तरच गरीबांना न्याय मिळेल” असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही सरकारवर ताशेरे ओढले. त्यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे समिती नोंदी शोधतच नाही. सरकारने समिती तयार केली, पण कुणबी नोंदी शोधण्यापासूनच रोखले जात आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात नोंदी मिळत असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.सातारा, पुणे, औंध संस्थानचा जीआर तातडीने काढावा, अन्यथा तीव्र आंदोलनाची चेतावणीही त्यांनी दिली. नागरिकांना जीआरप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र तातडीने द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
