धंगेकरांचे अखेर ठरलं! आजच काँग्रेसला करणार रामराम, शिंदे गटात करणार प्रवेश…

पुणे : रवींद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर हे वृत्त खरं होताना दिसत आहे.
कसबा पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर अखेर काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत. सेच काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी गळ्यात भगवा गमछा घातलेला फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला होता. यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजलं जात होतं.
मात्र रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, मी आता काँग्रेस पक्ष संघटनेत सक्रीय होणार, असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं. पण आता अखेर रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचं निश्चित झाल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान, पुण्यात एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी ठाण्यात हा पक्ष प्रवेश होणार आहे.
यावेळी स्वत: एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर धंगेकर यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.