पुण्याचं राजकारण तापलं! घायवळ गँगशी कनेक्शनबाबत धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांवर पुन्हा आरोप, नेमकं काय घडलं?

पुणे : पुणे शहरात घडणाऱ्या सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे वातावरण आधीच तापलेलं असताना, आता राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. अशाच पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरण पोलिसांनी घायवळ टोळीतील गुन्हेगारांवर कारवाई करत उघडकीस आणले

या प्रकरणी कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना निलेश घायवळ या गुंडाबाबत प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांनी ‘I Am Sorry’ असे म्हणत प्रश्न टाळल्याने त्यांच्या या प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय मंडळीत होत आहे.

अशातच आता शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वाद पेटवला आहे. धंगेकर यांनी पाटील यांच्यावर घायवळ गँगशी कनेक्शन असल्याचा थेट आरोप केला असून, त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तंग झालं आहे.

रविंद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, चंद्रकांत पाटील आत्मचिंतन करत असतील, पण त्यांच्या ताटाखाली काय चालतंय हे त्यांना माहिती नाही का?”, त्यांनी आरोप केला की, समीर पाटील हा मोक्याचा गुन्हेगार असून, त्याचाच निलेश घायवळसोबत संबंध होता. पोलीसही सांगतात की समीर पाटील पोलिसांवर दादागिरी करतो. मग गृहखात्याच्या मंत्र्यांच्या कामकाजात असा व्यक्ती कसा आहे?, असे ते म्हणाले.
धंगेकर यांनी याच संदर्भात पोलीस महासंचालकांना पत्र लिहून तपासाची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “जर पोलिसांना आंदेकर यांच्यावर बुलडोझर फिरवता येतो, तर कोथरूडमधील घायवळ गँगवरही तसंच केलं पाहिजे.
धंगेकरांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना समीर पाटील यांनी धंगेकर यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करू” असं सांगितलं. मात्र, त्यावर धंगेकर म्हणाले, “मला कोर्टात कधी नेणार याचीच मी वाट पाहतोय.
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, गुन्हेगारांना जे राजकीय पाठबळ देतायत, त्यांची दादागिरी बंद करण्याची वेळ आली आहे. चंद्रकांत दादांना विचारायला हवं की त्यांच्या कामकाजात असलेल्या लोकांकडे १०० कोटींची प्रॉपर्टी कशी आली? धंगेकर यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की, पोलिस स्टेशनमध्ये बसून गुन्हेगारांच्या तक्रारी दाबल्या जात आहेत. हे सगळं थांबवणं आता गरजेचं आहे.
