धनंजय मुंडे रात्रीपासून मुक्काम ठोकून, भगवानगड कुणाच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्री यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत. या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप झाली आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड हा काही दिवस फरार होता आणि त्यानंतर त्याने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसर्मपण केले. आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी यांनी गुरुवारी रात्री उशिरा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली आहे. रात्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावरच मुक्काम केला होता. दरम्यान, धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्याच बराच वेळ चर्चा झाली.

या चर्चेनंतर शुक्रवारी नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडेंना आमचा १०० टक्के पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय संतोष देशमुखांनी आरोपींना केलेली मारहाण देखील दखल घेण्यासारखी आहे, असं मोठं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केले आहे.
भगवान गडाचा धनंजय मुंडेंना पाठिंबा आहे का? असे विचारले असता नामदेव शास्त्री म्हणाले की, आम्ही केवळ धनंजय मुंडेंच्या पाठीशी नाही आहेत, आम्ही भक्कमपणे पाठीशी आहोत. जे गुन्हेगार असतील, त्याचा शोध सुरू आहे. पण मला मीडियाला एक विचारायचं आहे, ज्या लोकांनी ही निर्घृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली, हे मीडियाने का दाखवलं नाही. आधी त्यांना जी मारहाण झाली होती, ती देखील दखल घेण्यासारखी आहे, असं मला वाटतं, असे खळबळजनक वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केले आहे.
