Devendra Fadnavis : सगळा प्लॅन ठरलेला पण शरद पवारांनी ऐनवेळी…! देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट…
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.
यातच काही गौप्यस्फोटही करण्यात येत आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक खुलासा केलाय. २०१९मध्ये राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला आहे.
दिल्लीत भाजप-राष्ट्रवादीची उद्योगपती गौतम अदानींच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत अदानी उपस्थित नव्हते पण शरद पवार होते. राज्यात सरकारस्थापनेबाबत ही बैठक झाल्याचा दावा अजित पवार यांनी केला. याला आता फडणवीस यांनीही दुजोरा दिला.
राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात नोव्हेंबर २०१९ मध्ये अदानींच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला, गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि मी उपस्थित होतो. तेव्हा सरकार स्थापन करणं, खाते वाटप, पालकमंत्र्यांची नियुक्ती यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर हा प्लॅन प्रत्यक्षात आणायची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवारांवर सोपवली असेही फडणवीस यांनी म्हंटले आहे. Devendra Fadnavis
अदानींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे प्लॅन सुरू होता. सगळं प्रत्यक्ष अंमलात येत असताना शरद पवार मात्र त्यातून बाजूला झाले. शरद पवार अशी माघार घेतील असं आम्हाला वाटलं नव्हतं. राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्लॅन केला होता असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.