Devendra Fadnavis : आमदारांना त्या काळात त्रास दिला, पण एकही आमदार सोडून गेला नाही! देवेंद्र फडणवीस यांचे मोठं वक्तव्य…

Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे गेल्या ११ दिवसांपासून स्पष्ट झालं नव्हतं. अखेर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

भाजपच्या विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. भाजपचे निरीक्षक म्हणून आलेल्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस 2019 च्या जखमा आठवत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळयांचे आभार मानत ते म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी जनतेने कौल देऊन सुध्दा तो हिसकावून घेण्यात आला.

एकप्रकारे जनतेशी विश्वासघात केला गेला. सुरूवातीच्या अडीच वर्षात वेगवेगळ्याप्रकारे आपल्या नेत्यांना, आमदारांना त्रास देण्यात आला. मात्र एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. Devendra Fadnavis
फडणवीस म्हणाले की, २०२२ ला आपलं सरकार स्थापन झाले. त्यानंतर आज प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं. आजच्या निकालाने महाराष्ट्रात इतिहास घडला आहे. आता जबाबदारी वाढली आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा आणि समाजातील दलित, ओबीसी, वंचित सगळ्यांनीच जो जनादेश आपल्याला दिला आहे त्याचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागेल.
आपण सुरू केलेल्या योजना, दिलेली आश्वासने पूर्ण करणे याकडे प्राथमिकता असेलच, त्यासोबत महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सातत्याने कार्यरत राहायचे आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी २४ तास सरकार काम करेल. जनतेच्या आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.