Devendra Fadnavis : महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…
संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल-देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis पुणे : देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मोशी येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले.जनरल अजय कुमार सिंग, एअर मार्शल विभास पांडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, महेश शिंदे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात २०१७ मध्ये एअरोस्पेस आणि डिफेन्स धोरण तयार केले आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी १ हजार कोटीचा निधी तयार करण्यात आला. त्यातून ६०० एमएसएमई तयार झाल्या आहेत. केवळ ३०० कोटीतून १२ ते १५ हजार कोटींचे मूल्य या उद्योग संस्थांनी तयार केले. आज जगातले सगळे देश संरक्षण क्षेत्रात भारतासोबत काम करण्यास तयार आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईसाठी अधिक सुविधा आणि सवलती देण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल. रोजगार निर्मितीसोबत चांगली शस्त्रास्त्रे राज्यात तयार होतील याचेही प्रयत्न करू, असे फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis
पुणे देशाच्या सामरिकदृष्टीने महत्वाचे केंद्र..
पुणे हे भारताच्या सामरीक शक्तीच्यादृष्टीने महत्वाचे केंद्र असून गेल्या अनेक वर्षात संरक्षण उत्पादनाची चांगली व्यवस्था पुण्यात निर्माण झाली आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रणी आहे. देशाच्या वायुसेनेचे मेंटेनन्स कमांड, लष्कराचे दक्षिण कमांड, नौदलाचे मुंबई डॉकयार्ड महाराष्ट्रात आहे. नाशिकमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटीकल्समध्ये तेजस आणि सुखोई अशी लढाऊ विमाने तयार होतात, माझगाव डॉकमध्ये जहाज बांधणीची आधुनिक व्यवस्था आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्ससारखी संरक्षण क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानयुक्त काम करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे.
अमरावतीजवळ बीडीएल मिसाईल उत्पादन युनिट सुरू होत आहे. चंद्रयान-३ करता भंडाऱ्याच्या ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये काही भाग बनले. राज्यात ११ ऑर्डीनन्स फॅक्टरी, ५ डिफेन्स पीएसयु, ८ विविध प्रकारच्या प्रयोगशाळा आहे. पुण्यात डिआरडीओची सर्वोत्तम सुविधा आणि देशाची महत्वाची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीदेखील आहे. म्हणून एमसएसमईसाठी महत्वाचे स्थान महाराष्ट्र आहे आणि राज्यात पुणे आहे.
अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग ही मोठी संधी..
संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. पुणे तंत्रज्ञानाची राजधानी आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे गेला आहे. यासाठी पुरवठा साखळीचा भाग होणाऱ्या एमएसएमईसाठी चार क्लस्टर तयार करण्याचे उद्योग विभागाने ठरविले आहे.
त्यातून या क्षेत्रात काम करणारे उद्योजक तयार करता येतील. प्रदर्शनात खाजगी संस्थांचा चांगला सहभाग आहे. नवीन इको सिस्टीम तयार करण्यासाठी ही महत्वाची बाब आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स मॅन्युफॅक्चरींग ही मोठी संधी आहे. प्रदर्शनातून आपल्याला या इको सिस्टीमचा भाग कसा होता येईल याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.