Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे मोठ वक्तव्य! मराठा समाजासाठी ओबीसी नेत्यांना विश्वासात घेऊन ‘सगेसोयरे’ची अधिसूचना काढणार..!!
Devendra Fadnavis : मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. ते आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा साहवा दिवस असून, त्यांची तब्येत खालावली आहे.
अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना यांनी उपोषण स्थगित करावे, असे आवाहन केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘सगेसोयरे’ अधिसूचनेबाबत राज्य सरकार संवेदनशीलपणे कार्यवाही करत आहे.
सरकारने काढलेली अधिसूचना ही ओबीसी समाजाच्या विरोधातील नाही. ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना आजही सर्टिफिकेट देता येते. रक्ताच्या नात्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांनुसारच ही अधिसूचना आहे.
त्यामुळे ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन ‘सगेसोयरे’ अधिसूचना काढण्याची अंतिम कार्यवाही पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. Devendra Fadnavis
सरकार सकारात्मक कार्यवाही करत असल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ‘सगेसोगरे’बाबतची अंतिम अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे.
त्यांच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे यांची ‘सगेसोयरे’संदर्भात जी मागणी आहे त्यावर सरकारने पहिली अधिसूचना जारी केलेली आहे. त्यावर सूचना-हरकती मागविल्या आहेत. त्यानुसार तिथे कार्यवाही चालू आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही.
मी स्वतः ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे. विशेषतः, छगन भुजबळ यांच्यासह अन्य ओबीसी नेत्यांसोबत यापुढेही चर्चा केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने रक्ताच्या नात्यांसंदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत, त्या निकषांत बसणारीच ही अधिसूचना आहे.
त्यामुळे याबाबतची अंतिम अधिसूचना निघाली, तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. तशाप्रकारची चर्चा ओबीसी समाजाशीदेखील आम्ही करणार आहोत.
त्यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात सर्व ओबीसी नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांना आम्ही पटवून देऊ आणि जेवढ्या लवकरात लवकर हे पूर्ण करता येईल तेवढ्या लवकर ही कार्यवाही पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.