Devendra Fadnavis : भाजप नेत्याच्या एका वक्तव्याने धक्कातंत्राची सुरुवात? राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स वाढला, नेमकं घडतंय काय?
Devendra Fadnavis : संपूर्ण राज्य अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा करत आहे. कारण, महायुतीकडून आत्तापर्यंत ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजूनही महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे.
निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला असताना, शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे, पण खातेवाटपावर अजून अंतिम निर्णय होणं बाकी आहे. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली. तर, दुसरीकडे आता विधीमंडळ गटनेत्याची निवड ४ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.
भाजपचे केंद्रीय निरीक्षक आज रात्री मुंबईत येणार आहेत. उद्या विधीमंडळाच्या सभागृहात गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे. गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित मानली जात आहे. मात्र, भाजपात धक्कातंत्राची चर्चा एका नेत्याच्या वक्तव्याने सुरू झाली आहे.
भाजपच्या केंद्रीय समितीकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी, केंद्रीय निरीक्षक भाजपचे नवनिर्वाचित आमदारांची भेट घेणार आहेत.
या बैठकीत आमदारांची मते जाणून गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर अजूनही भाजपने गटनेत्याची निवड न केल्याने धक्कातंत्राच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्याआधीच भाजपने सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर केली.
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले की , भाजपचा विधीमंडळ नेता निवडण्यासाठी बैठक होणार आहे. विधीमंडळ गटनेत्याची नावे घेऊन प्रतिनिधी येतात. त्यानंतर नवनिर्वाचित आमदार नावे निवडतील. या निवडीनंतर अधिकृत घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले आहे. Devendra Fadnavis
काही राजकीय विश्लेषकांनी विधीमंडळ गटनेत्याच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीवरून येईल, या मुनगंटीवार यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळेच दिल्लीतील धक्कातंत्राची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांचे नाव 99 टक्के निश्चित आहे. पण, उरलेल्या एक टक्का शक्यतेचा काही अंदाज लागत नाही.
राज्यातील भाजपच्या जवळपास सगळ्याच आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. पण, दिल्लीवरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने कोणाचे नाव निश्चित केले हे गुलदस्त्यात आहेत. त्यामुळेच भाजपच्या धक्कातंत्राची चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा संधी नाकारण्याचे ठोस कारणही नाही. मात्र, मागील काही वर्षात भाजपने वापरलेल्या धक्कातंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाल्या आहेत.