राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग, सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री, नेमकं घडतंय काय?

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज सायंकाळी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

आज सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या शपथविधीमुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. मात्र या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे संकेत मिळत आहेत.


अजित पवारांच्या निधनापूर्वी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र लढताना दिसत होते. त्यामुळे विलीनीकरणाची चर्चा जोर धरत असतानाच, अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक राजकीय प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार , सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करून त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर टीमने घेतला आहे. काही घटकांकडून दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू असल्याने, त्या चर्चांना आळा घालण्यासाठीच हा निर्णय तातडीने घेण्यात आल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शपथविधी लवकरात लवकर उरकण्यावरही कोअर टीममध्ये एकमत झाल्याचे समजते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या वरिष्ठ नेत्यांनीच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची भूमिका पुढे आणली असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार शपथविधी पूर्ण झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आहे. पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांसमोर पार्थ पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पार्थ पवारांना राज्यसभेची संधी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या शपथविधीबाबत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाशी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाशी संवाद टाळल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. काल बारामतीत अजित पवारांच्या रक्षा विसर्जनाच्या वेळी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसल्या होत्या. त्यानंतर मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित झाले.
महत्त्वाचं म्हणजे, या साऱ्या प्रक्रियेत सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यात अद्याप भेट झालेली नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना मोठा अडसर निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
