शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीची झीज ! साईबाबा संस्थानला झीज रोखण्यासाठी करणार हे उपाय ….

शिर्डी : साईबाबांच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी दुग्धाभिषेक व अन्य शिर्डीपदार्थांचा वापर टाळण्याचा सल्ला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयातील तज्ज्ञांनी दिला आहे. त्यांनी शिर्डी येथील साईबाबा मंदिराची पाहणी करून मूर्तीच्या देखभालीसाठी उपाय सुचवले आहेत. साईबाबा संस्थान समिती लवकरच या बाबत निर्णय घेणार आहे.

देशातील एक प्रसिद्ध तीर्थस्थळ म्हणून परिचित असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिर. साईबाबांचे केवळ देशातील नव्हे तर विदेशात देखील मोठ्या प्रमाणात भक्त आहेत, त्यामुळे शिर्डीत देश – विदेशातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.शिर्डी येथे असलेल्या साईबाबा यांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक, दही, चंदन, गंध इत्यादींचा वापर करण्यात येतो मात्र दिवसेंदिवस होत असलेल्या या प्रक्रियेमुळे मात्र साईबाबांच्या मूर्तीला इजा पोहचत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे नुकसान थांबवण्यासाठी साईबाबा संस्थान समितीकडून ठोस पावले उचलली जात आहेत.
शिर्डी येथे साईबाबा मूर्तीचे संरक्षण आणि झीज थांबवण्यासाठी पाच तज्ज्ञांचे पथक साईबाबा मंदिरात दाखल झाले होते. त्यांनी तीन तास मंदिरात पाहणी केली. या काळात मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. साईबाबा मूर्तीवर काळे डाग आणि झीज झालेली ठिकाणे तपासण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर करून अभ्यास करण्यात आला.

तज्ज्ञांनी मूर्तीची झीज थांबवण्यासाठी दुग्धाभिषेक, दही, चंदन, गंध इत्यादींचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. मूर्तीला कमी पाण्याने स्नान घालण्यास आणि टॉवेलने स्वच्छ करण्यासही प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मूर्तीच्या झिजलेल्या भागांचे मायक्रो इन्स्पेक्शन करून संगणकाद्वारे अभ्यास करण्यात आला आहे.
संस्थान समितीला लेखी अहवाल सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली. साईभक्तांना मूर्तीच्या संरक्षणासाठी उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.