मोठी राजकीय घडामोड! बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; पुरावे समोर, नेमकं काय घडलं?

मुंबई : अशोक खरात प्रकरणात राजकीय कनेक्शन उघड होत असतानाच अमरावतीतून आणखी एक खळबळजनक घडामोड समोर आली आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून भाजप आमदाराच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार येथे बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यावर अचलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार अभिजित दिवाकरराव तायडे (वय.४०) यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली असून, बच्चू कडू यांच्यासह गोलू माहुरे याच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अपघाताचा बनाव करून जीव घेण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कटात शुभम उर्फ गोलू माहुरे याचाही सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाशी संबंधित कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून, संबंधित मोबाईल संभाषणाचे रेकॉर्डिंग पुराव्यासह पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणातील तपास अधिक वेगाने आणि गंभीरतेने सुरू असल्याचे समोर येत आहे.
सदर प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणून कॉल रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह पोलिसांकडे जमा करण्यात आला आहे. चांदूर बाजार पोलिसांनी या प्रकरणी BNS कलम 55, 58 आणि 61 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
हे रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल येणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करत असून, या धक्कादायक घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.