उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरे गावात विश्रांती दौरा; चर्चा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेची..

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी, सातारा जिल्ह्यातील दरे येथे विश्रांतीसाठी दोन दिवस गेले होते. दोन दिवसांचा दरे गावचा दाैरा संपवून एकनाथ शिंदे आज मुंबईकडे दुपारी रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आता जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी आपल्या मूळ गावी म्हणजे दरेगावाला भेट देतात. तिथे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी देखील भेट घेतात. यावेळी दरे गावातून बोलताना म्हटले की, आपण गेल्यावर्षी सफरचंदाची बाग लावली होती. यावर्षी त्याला सफरचंद लागली आहेत. यासोबतच काजू, आवळा, अवकाडो अशी नवीन नवीन झाडे आपण लावली आहेत. यासोबतच ब्रोकलीचीही लागवड केली आहे. या भागात कुठल्या कुठल्या पद्धतीची झाडे येऊ शकतात आणि त्याची वाढ होऊ शकते हे पाहणे सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री असे मोठे पद असतानाही वेळ मिळेल, त्यावेळी एकनाथ शिंदे आपल्या गावी जाऊन वेळ घालवतात.आपल्या शेतांमध्ये अधिक वेळ घालून नवनवीन पिके कशी घेता येतील, यावर त्यांचा अधिक भर असतो. या दोन दिवसाच्या दौऱ्यानंतर आज ते मुंबईत परतणार आहेत.

दरम्यान राज्यातील महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना नंबर दोनचा पक्ष ठरला. भाजपासोबत युती करून एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुका लढल्या आणि थेट अनेक महापालिकांवर सत्ता आणली. दरम्यान ते दरे गावाला गेले असल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या स्थापनेबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत.