राज्यातून राजीनाम्याची मागणी अन् अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी!! धनंजय मुंडे यांना दिलं मोठं पद…

मुंबई : महायुतीमध्ये सध्या सर्वात सुखी अजित पवार असल्याचे म्हटले जाते. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे रोज विरोधकांच्या आणि माध्यमांच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर पीकविमा घोटाळ्यापासून सुरु झालेली आरोपांची मालिका, त्यांच्या खासगी आयुष्यातील दोन पत्नींच्या वादापर्यंत जाऊन पोहचली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळेही त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. आमदारांच्या निशाण्यावर असतानाही धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाकडून कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सोबतीने धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत पत्रक काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
कोअर ग्रुपच्या अग्रस्थानी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार राहणार आहेत. तर त्यांच्यासोबत आणखी सहा मंत्र्यांना या कोअर ग्रुपचे सदस्य करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, आमदार दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा कोअर ग्रुपमध्ये समावेश आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्षसंघटनेची बांधणी, महत्वाच्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करणे याची जबाबदारी सदस्यांवर असणार आहे.
दरम्यान, धनंजय मुंडेंवर आतापर्यंत अनेकांकडून आरोपास्त्र डागण्यात आले आहे. तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी अजूनही लावून धरली जात आहे. असे असताना अजित पवारांनी त्यांच्यावर महत्वाची धुरा सोपवल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.