दिल्लीची एण्ट्री ठरली? सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब? महत्वाची माहिती आली समोर…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्या सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर कोण जाणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता या जागेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.

एनसीपीची कोअर टीम आणि मित्रपक्ष भाजपा-शिवसेनेनं (शिंदे गट) पार्थ पवार यांच्या नावास सहमती दर्शवलीय. या सर्वांच्या सहमतीनंच पार्थ पवार यांची राज्यसभा जागेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. जय पवार यांच्याऐवजी पार्थ पवार यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्यसभेवर पार्थ पवार यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे.


दरम्यान यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. लवकरच उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यसभेच्या या जागेवर अखेर पार्थ पवार यांची वर्णी लागते का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
विशेष म्हणजे, सुरुवातीला जय पवार यांचं नाव चर्चेत होते. पण आता वेगळीच घडामोड समोर येतेय. पार्थ पवार यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली आहे, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
