कसबा पेठ व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव करून सत्तेचा माज उतरवा ! : नाना पटोले
मुंबई : भाजपाचे मंत्री, नेते हे सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पंतप्रधान मोदी स्वतःला राजा समजू लागलेत तर भाजपाच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला आहे, हा सत्तेचा माज कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उतरवून भाजपाला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
कसबा पेठ व चिंचवडच्या निवडणुकीसाठी मविआ आघाडीची संयुक्त प्रचारसभा चिंचवड येथे पार पडली. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार व शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. नाना पटोले म्हणाले ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतच महाराष्ट्राची बदनामी केली. कोरोना काळात भाजपाचे सरकार झोपले होते तर महाविकास आघाडीच्या सरकारनेच लोकांना आधार दिला, मदत पोहचवली.
नाना पटोले म्हणाले भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार परवा म्हणाले की, राहुल गांधी व नरेंद्र मोदींमध्ये खूप फरक आहे, त्यांची तुलना होऊ शकत नाही. त्यांचा समाचार घेत पटोले म्हणाले की, मुनगंटीवार खरे तेच बोलले. राहुलजी व मोदी यांची तुलना करताच येत नाही कारण राहुलजी गांधी देश जोडण्याचे काम करत आहेत तर नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करत आहेत, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून फक्त देशाची संपत्ती एक-एक करून विकून देश चालवत आहेत.
संविधान व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहेत. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटत आहेत, छोटे व्यापारी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहेत. म्हणून राहुलजी गांधी व नरेंद्र मोदी यांच्यात तुलना होऊच शकत नाही, असा टोला लगावला.
केंद्रातील भाजपाचे सरकार सामान्य जनतेच्या घामाचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून जमा करते व उद्योगपती मित्रांचे कर्ज फेडते. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकतो, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देतो, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो अशी आश्वासने देऊन नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि नंतर तो निवडणुकीतला जुमला होता असे म्हणून जनतेच्या फसवणूक केली.
पिंपरी चिंचवडच्या विकासात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे योगदान मोठे आहे. बेईमानी करून सरकार पाडले. आता तुम्हाला संधी आली आहे ती भाजपाच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात उभे राहण्याची. मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर व नाना काटे यांना बहुमताने विजयी करा व भाजपाला महाविकास आघाडीची शक्ती दाखवून द्या, असेही नाना पटोले म्हणाले.