पुणेकरांनो पाणी जपून वापरा! उन्हाळ्याआधीच शहरातील या महत्त्वाच्या भागात पाणीपुरवठा कपातीचा निर्णय…


पुणे : उन्हाळा अद्याप पूर्णपणे सुरूही झाला नाही, मात्र पुण्यातील वानवडी परिसरात पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. वानवडी परिसरात आधीच पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असताना, आता प्रशासनाने पाणीपुरवठ्यात १ एमएलडीची कपात केल्याने नागरिकांच्या अडचणींत मोठी भर पडली आहे.

प्रशासनाने पाणीपुरवठ्यात १ एमएलडीने कपात केल्याने स्थानिक नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आधीच कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असून महापालिकेवर टीका होत आहे.

सुमारे आठ महिन्यांपूर्वी वानवडी भागाला दररोज १० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुरवठा वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना, उलट तो ९ एमएलडीपर्यंत कमी करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे आधीच अपुरा वाटणारा पुरवठा आणखी घटला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल जांभूळकर यांनी यासंदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच लष्कर पाणीपुरवठा विभागाकडे लेखी तक्रार सादर केली आहे. त्यांनी ही कपात अन्यायकारक असल्याचे नमूद करत निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या कपातीचा थेट परिणाम वानवडी गाव, होले मळा, जांभूळकर मळा, तात्या टोपे सोसायटी परिसर आणि एसव्हीनगर या भागांवर जाणवत आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना दैनंदिन वापरासाठी साठवणूक करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. विशेषतः गृहिणींना घरगुती कामांचे नियोजन विस्कळीत झाल्याची भावना आहे. काही सोसायट्यांमध्ये पाणी साठवण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्याची वेळ आली आहे.

लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश शिंदे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरात पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात कपात करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या नियमित पुरवठा सुरू असून ज्या भागांत कमी दाबाच्या तक्रारी येत आहेत, त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!