तलाठी पदाची परीक्षा देऊन परतणाऱ्या तरुणावर काळाची झडप, लोणी काळभोर येथे अपघातात जागीच मृत्यू…

लोणी काळभोर : सध्या रोडवर अपघातांचे प्रमाण खूपच वाढले आहे. यामुळे यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत. आता गावकामगार तलाठी पदाची परीक्षा देऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला टेम्पोने दिलेल्या धडकेत एकजणाचा जागेवरच मृत्यू झाला.
तसेच एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात पुणे – सोलापूर महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल मनाली समोर गुरुवारी (ता. ०७) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
मुन्ना मोमीन पठाण (रा. बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आशिष रामदास जवरे रा. शेवगाव जी. अहमदनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुन्ना व आशिष हे दोघेजण दुचाकीवरून पुण्याच्या बाजूने पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निघाले होते. यावेळी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल मनाली समोर पाठीमागुण आलेल्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली.
यावेळी पाठीमागे बसलेल्या मुन्ना हा रस्त्यावर कोसळला. रस्त्यावर कोसळल्याने टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडला. यातच मुन्ना याचा जागेवरच मृत्यू झाला.
सदर अपघाताची माहिती मिळताच कुंजीरवाडीचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते सचिन तात्या तुपे, पोलीस हवालदार उमेश ढाकणे, पोलीस अंमलदार विजय काणेकर आदींनी घटनास्थळी मदत केली.
दरम्यान, यावेळी लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी झाली होती. सदर घटनेचा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.