पहिल्या पतीचा मृत्यू, दुसऱ्यासोबत पैशांवरुन भांडण, पुण्यात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या नवऱ्यानं बायकोसोबत केलं भयानक कृत्य…

पुणे : भंगार विक्रीतून आलेल्या पैशांच्या हिश्श्यावरून झालेल्या क्षुल्लक वादाचे पर्यवसान एका भीषण हत्येत झालं. पुण्यातील मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे हद्दीत ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पतीने रागाच्या भरात पत्नीची काठीने मारहाण करून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेनंतर बावधन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
कुसुम वसंत पवार (वय. ३२) असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून, दत्ता काळुराम जगताप (वय ३०, रा. बेबडओहळ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुसुम पवार यांच्या पहिल्या पतीचं निधन झालं होतं. त्यानंतर त्या आरोपी दत्ता जगताप याच्यासोबत पत्नी म्हणून राहत होत्या. हे दाम्पत्य भंगार गोळा करणे आणि मासेमारी करून आपली उपजीविका चालवत होते.
(शनिवारी दि. १७ जानेवारी) भंगार विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून दोघांमध्ये जोरदार खटका उडाला. हा वाद इतका वाढला की, संतापलेल्या दत्ताने कुसुम यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने कुसुम यांच्या पोटावर, मानेवर आणि डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केले. या मारहाणीत त्या जमिनीवर कोसळल्या. मात्र, आरोपीचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही.
त्याने जमिनीवर पडलेल्या कुसुम यांच्या डोक्यात जड दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. पती-पत्नीमधील हे जीवघेणे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एका महिलेवरही आरोपीने हल्ला चढवला.
त्याने या महिलेच्या हातावर काठीने वार केल्यामुळे त्यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच बावधन पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी दत्ता जगताप याला बेड्या ठोकल्या.
