बारामतीसारखा मतदार देशात कुठे सापडणार नाही , लाडक्या बहिणींनी मतदान केले मात्र मेव्हण्यांनी दुसरी बटणं दाबली ..!

बारामती : लोकसभेला आम्हाला ज्या मतदान केंद्रावर 800 मते कमी मिळाली, तिथे विधानसभेला दीड हजार मतं जास्त मिळालेत.. बारामतीकरांसारखा मतदार देशात सापडणार नाही. खरंतर यावेळी मला माझ्या लाडक्या बहिणींनी वाचवलं. लोकसभा झाल्यावर विचार करत होतो, कसेही करून सरकार आलं पाहिजे. त्यातून ही योजना आणली आमच्या मेहुण्यांनी दुसरी बटन दाबली असली, तरी लाडक्या बहिणींनी मात्र योग्य बटन दाबली असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केले.

बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. ईव्हीएम वर बोलत आहेत. वास्तविक लोकसभेला जो लोकांनी कौल दिला, तो आम्ही मान्य केला होता. विधानसभेला जो कौल लोकांनी दिला आहे, तो मान्य केला पाहिजे, परंतु विरोधक मात्र अजूनही रडीचा डाव खेळत आहेत.
पवार म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातील 396 मतदान केंद्रापैकी फक्त चार मतदान केंद्रावर मी पिछाडीवर आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एखाद्या सरकारला एवढं प्रचंड बहुमत मिळाले आहे. आता आमची जबाबदारी आणखी वाढली असून, आणखी विकास कामे करण्याची देखील आम्हाला संधी मिळाली आहे.

बारामतीत मी नव्या इमारती बांधणार आहे, परंतु त्या काही हवेत बांधता येणार नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोकांना जागा द्यावी लागेल, मात्र त्याचा योग्य मोबदला त्यांना मिळेल असेही पवार म्हणाले.