लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! एप्रिलच्या हप्त्याबाबत मंत्री तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, जाणून घ्या..

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि ५०० रुपयांचा गोंधळ काय आहे, यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता महिना संपण्यापूर्वी खात्यात जमा होईल. त्यांनी याआधी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता ८ मार्चला, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्याची आठवण करून दिली. यावेळी अक्षय्य तृतीयेला एप्रिलचा हप्ता देण्याचा सरकारचा विचार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
दरम्यान, काही महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त ५०० रुपये मिळाल्याची तक्रार होती. यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेतून आधीच १००० रुपये मिळतात, त्यांना लाडकी बहीण योजनेतून ५०० रुपये अतिरिक्त दिले जातात.
अशा महिलांना एकूण १५०० रुपये दिले जातात, जे शासनाच्या ठरावानुसार ठरवलेले आहे. हे दोन्ही शासन निर्णय आधीच स्पष्ट आहेत, त्यामुळे कुठलाही अन्याय किंवा गोंधळ झाला नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.