लाडक्या बहिणी सरकारच्या नव्या नियमामुळे अडचणीत ; KYC करण्यास तांत्रिक अडचणी,लाभापासून वंचित राहणार?

पुणे: गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या दणक्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. आता या योजनेतील बोगसगिरीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र आता यामुळे अनेक महिला लाभार्थींना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य सरकारने योजनेतील बोगस लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची अचूक छाननी करण्यात येत होती. यामुळे बोगस अर्ज आपोआप रद्द होतील आणि खऱ्या पात्र महिलांनाच लाभ मिळेल, अशी सरकारची अपेक्षा आहे. मात्र, सध्याची तांत्रिक अडचण पाहता बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी उचललेले हे पाऊल खऱ्या पात्र महिलांसाठीच अडथळा ठरत आहे. कागदपत्रे सादर करूनही केवळ तांत्रिक बिघाडामुळे प्रक्रियेत अडकून पडल्याने महिला अडचणीत आल्या आहेत.ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी महिलांना अनेक तास सायबर कॅफेमध्ये वाट पाहावी लागत आहे. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट वारंवार हँग होणे, त्याचे सर्वर डाऊन असणे या अशा समस्यांमुळे त्यांची नोंदणी पूर्ण होत नाही.

दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला दूरदूरहून केंद्रांवर येतात. पण रांगा लावूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. यामुळे लाभार्थी महिलांनी वेबसाईट तात्काळ सुरळीत करावी, अशी मागणीही केली आहे.

