आरटीई’ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी 1 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, आता लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे केले आवाहन..

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली ऑनलाइन प्रक्रिया 1 एप्रिल 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही, ते आता 1 एप्रिलपर्यंत प्रवेश घेऊ शकतात. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावर्षी पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 18 ते 24 मार्च 2025 या कालावधीत पूर्ण करायचे होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनही प्रलंबित असल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही मुदत 1 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांनी घाई करून प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) वंचित आणि दुर्बल घटकातील 25 टक्के विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. दरम्यान, मुंबई विभागातील 327 शाळांमध्ये 1,260 पात्र अर्जदारांची निवड केली होती. त्यापैकी 246 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर 4 अर्जदारांचे प्रवेश नाकारले गेले.
असे असताना मात्र, अद्याप 1,010 अर्ज प्रलंबित आहेत. शिक्षण विभागाने पात्र अर्जदारांना एसएमएसद्वारे सूचना पाठवल्या आहेत. पालकांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले. यासाठी अजून काहीच दिवस बाकी राहिले आहेत.