Daund News : दौंडमध्ये भाजपला मोठा धक्का! शरद पवारांनी थेट जिल्हाध्यक्षच फोडला, १५ तारखेला होणार पक्षप्रवेश…

Daund News : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.

अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जनता पक्षाचे दौंड तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय राजाराम ताकवणे यांचे चिरंजीव व पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नामदेव ताकवणे यांनी बुधवारी (ता. १०) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती गोविंदबाग येथे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
भाजपच्या निष्ठावतांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तर पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम दौंड तालुक्यातील यवत येथे १५ एप्रिल २०२४ रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. भाजप पक्षाला हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का मानला जात आहे. देशात इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर १९७८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यातून जनता पक्षाचे उमेदवार राजाराम ताकवणे विजयी झाले होते. Daund News

या माजी आमदारांचे चिरंजीव नामदेव ताकवणे १९९० पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभागी होते. त्यानंतर त्यांची १९९९ साली भारतीय जनता पक्षाच्या दौंड तालुका सरचिटणीसपदी निवड झाली.