Daund News : कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीने नागरिक संतापले, दौंडमध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तडकाफडकी बदली, नेमकं कारण काय?

Daund News : दौंड पोलीस ठाण्याचा फक्त चार्ज घेतला आणि लागलीच हद्दीतील अवैध धंदे बंद करून, बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणारे, रोडरोमीओ तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या काही तासातच जेरबंद करणारे पोलीस खात्यातील एक जिगरबाज पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची लगेचच तडकाफडकी बदलीही करण्यात आली.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नुकताच दौंड पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला आहे, आणि त्या दिवसापासूनच त्यांची कारकीर्द गाजत आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसातच त्यांनी विविध गुन्ह्यात फरार असणाऱ्या जवळपास ३० ते ३५ जणांना जेलची हवा दाखविली आहे.
लग्न समारंभात सामील होऊन वराडी मंडळींचे दागिने व पैसे चोरणाऱ्या टोळीला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले आहे. शहरातील सर्व अवैध धंदे त्यांच्यामुळेच बंद आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून बाजारपेठेतील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या अतिक्रमणांवर त्यांनी कारवाई करून अतिक्रमणे काढली व शहरातील रस्ते त्यांनी मोकळे केले आहेत.
दरम्यान, चंद्रशेखर यादव यांची लगेचच तडकाफडकी बदलीही करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बदलीचे आदेश जारी नुकताच केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढत असताना त्यांची बदली कशी काय होऊ शकते, असा प्रश्न दौंडकरांना पडला आहे. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी, साहेबांनी किमान त्यांचे ऐकून तरी घ्यावे अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. आणि त्यांची ही अपेक्षा चंद्रशेखर यादव यांनी पूर्ण केली होती असा अनुभव दौंडकर नागरिकांना आला आहे. Daund News
दरम्यान, त्यांच्या बदलीचे नेमके कारण मात्र समजू शकले नसले, तरीही ही बदली राजकीय दबाबातुन झाली असल्याची चर्चा असून ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या या कामकाजावर ग्रामीण भागात विशेषता दौंड तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या बदलीनंतर त्यांची जागी कोणाची नियुक्ती केली आहे हे मात्र समजू शकलेले नाही.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या या कामकाजामुळे अल्पवधीतच त्यांनी दौंडकरांची मने जिंकली होती. त्यांच्या कामकाजावर सर्वसामान्य जनता, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिला वर्गांकडून समाधान व्यक्त केले जात होते. मात्र यादव यांची अचानक बदली झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ह्या बदलीमागे राजकीय हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.