Daund News : पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली रद्द करण्याची सर्वपक्षीय पदाधिकारी व दौंडकरांची मागणी…

Daund News : दौंड पोलीस ठाण्याचा फक्त चार्ज घेतला आणि लागलीच हद्दीतील अवैध धंदे बंद करून, बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणारे, रोडरोमीओ तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या काही तासातच जेरबंद करणारे पोलीस खात्यातील एक जिगरबाज पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची लगेचच तडकाफडकी बदलीही करण्यात आली.
अशातच आता दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची करण्यात आलेली तडकाफडकी करण्यात आलेली बदली त्वरित रद्द करून त्यांना पुन्हा दौंड पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात यावा अशी मागणी दौंड शहरातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दौंड पोलीस ठाण्याचा महिन्यापुर्वी कार्यभार स्विकारलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व बेकायदेशीर धंदे बंद करून कारवाईच्या माध्यमातून अवैध धंदे करणाऱ्यांवर जो वचक बसविला, त्यामुळे दौंड शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगल्या पध्दतीने राखण्यात यश आले.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नुकताच दौंड पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला आहे, आणि त्या दिवसापासूनच त्यांची कारकीर्द गाजत आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसातच त्यांनी विविध गुन्ह्यात फरार असणाऱ्या जवळपास ३० ते ३५ जणांना जेलची हवा दाखविली आहे. Daund News
लग्न समारंभात सामील होऊन वराडी मंडळींचे दागिने व पैसे चोरणाऱ्या टोळीला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले आहे. शहरातील सर्व अवैध धंदे त्यांच्यामुळेच बंद आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून बाजारपेठेतील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या अतिक्रमणांवर त्यांनी कारवाई करून अतिक्रमणे काढली व शहरातील रस्ते त्यांनी मोकळे केले आहेत.
त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढत असताना त्यांची बदली कशी काय होऊ शकते, असा प्रश्न दौंडकरांना पडला आहे. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी, साहेबांनी किमान त्यांचे ऐकून तरी घ्यावे अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. आणि त्यांची ही अपेक्षा चंद्रशेखर यादव यांनी पूर्ण केली होती असा अनुभव दौंडकर नागरिकांना आला आहे.
दौंड शहर व तालुक्यातील नागरीकांकडून याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पोलीस निरीक्षक यादव यांची बदली स्थगित करुन त्यांना पुन्हा दौंड पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात यावा. अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरीकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, या निवेदनावर पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अमित सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे निखिल स्वामी, माजी नगरसेवक इंद्रजीत जगदाळे, ज्येष्ठ नेते नागसेन धेंडे, भारत सरोदे, सागर उबाळे, प्रशांत धनवे, सचिन कुलथे, अफझल पानसरे, दीपक सोनवणे, प्रकाश सोनवणे, आनंद पळसे आदींसह शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.