पुण्यात दादा विरुद्ध अण्णा संघर्ष पेटणार; दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची मुरलीधर मोहोळांनी उडवली खिल्ली, म्हणाले…

पुणे :राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे.नुकतीच मनसे आणि ठाकरे गटाची युती झाली असताना आता दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीची पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खिल्ली उडवली आहे. त्यामुळे पुण्यात दादा विरुद्ध अण्णा असा संघर्ष पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी असे म्हटले आहे की,भाजपच्या विरोधात सगळे एकत्र येत आहेत. दोन राष्ट्रवादी एकत्र येत असल्या तर त्यांना शुभेच्छा आहेत. पण पुणेकरांनी भाजपला भक्कम साथ आहे.याचा अर्थ असा की, पैलवान मजबूत ताकदवान आहे म्हणून सगळे छोटे छोटे पैलवान एकत्र येत आहेत.या प्रतिक्रियेतून त्यांनी अजित पवारांसह इतर पक्षातील नेत्यांना अप्रत्यक्षपणे त्यांनी छोट्या पैलवानांची उपमा दिल्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा वाद पाहायला मिळणार आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असलेल्या मोहोळ यांचे शहरातील पारडे जड होऊ लागल्याचे पक्षात सांगण्यात येत आहे त्यातच त्यांनी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तडे देण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर ‘दादा विरुद्ध अण्णा’ या नव्या संघर्षाला सुरूवात झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

