दादा आज तुम्ही…राष्ट्रवादीच्या नेत्याच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. या भीषण अपघाताने केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

या धक्क्यातून राज्य अजून सावरत नाही, तोच शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केलेल्या एका खळबळजनक फेसबुक पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या तयारीत होते, असा धक्कादायक दावा काकडेंनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

अंकुश काकडे यांनी नुकतंच एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवारांच्या निधनानंतरची पोकळी आणि त्यांच्याशी झालेल्या एका गुप्त चर्चेचा संदर्भ दिला आहे. आज दादा तुम्ही हवे होतात, एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज करणार होतात, असे अंकुश काकडे यांनी म्हटले आहे. या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
अंकुश काकडे यांनी केलेल्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्यासाठी १२ फेब्रुवारी ही तारीख खुद्द अजित पवार यांनीच चर्चेअंती ठरवली होती.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेली कटुता संपवून पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे, यासाठी अजित पवार स्वतः प्रयत्न करत होते. त्या संदर्भातील अंतिम घोषणा किंवा स्वाक्षरी आज होणार होती, असे दावा अंकुश काकडे यांनी या पोस्टद्वारे केला आहे.