दौंड तालुक्यातील यवत येथील जमावबंदी पूर्णपणे हटवली, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय…

यवत : दौंड तालुक्यातील यवत परिसरात मागील आठ दिवसांपासून तणावाचे वातावरण असून अशांतता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शुक्रवारी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. असे असताना आजपासून जमावबंदी हटवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गावात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून सध्या यवतमध्ये शांततेचे वातावरण असले तरीही भीतीचे सावट कायम असल्याचे चित्र आहे. मात्र पोलिसांनी धार्मिक स्थळे, दुकाने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. यवत येथे (ता.१) रोजी सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे अनेक ठिकाणी जमावाकडून जाळपोळ व दगडफेक करण्यात आली होती.
काही वेळातच पोलिस प्रशासनाने परस्थिती आटोक्यात आणली. या घटनेने संपूर्ण बाजारपेठ बंद होती, तसेच भयाण शांतता पसरलेली आहे. यामध्ये शंभर जणांच्या आसपास गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील १५ जणांना दौंड न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या सभेमुळेच आणि त्यांनी केलेल्या चिथावणी खोर भाषणामुळेच ही दंगल झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला असून आमदार गोपीचंद पडळकर आणि जगताप यांच्यावर ही गुन्हे दाखल करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.
दरम्यान, गावात चौका चौकात पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला असून गावात अनेकांचा उधार निर्वाह हा दैनंदिन व्यवहारावर अवलंबून आहे. यामुळे जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे. बाहेरून येऊन काहींनी स्थानिकांची माथी भडकावून स्थानिक हिंदू मुस्लिम समाजात वाद निर्माण केले अशी चर्चा नागरिक करत आहे.