दौंड हादरलं! स्वामी चिंचोलीत आईनेच दोन चिमुकल्यांची केली हत्या, नवऱ्यावरही कोयत्याने वार, नेमकं काय घडलं?

दौंड : तालुक्यातील स्वामी चिंचोली गाव अक्षरशः हादरले आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातही खळबळ उडाली. येथील स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्तीवर दुर्योधन बाबासाहेब मिंडे त्यांचे घर आहे. या घरी आज एकाच वेळी आईनेच दोन वर्षाच्या मुलीची व एक वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एवढ्यावरच न थांबता तिने धारदार शस्त्र घेऊन नवऱ्याच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले आहेत, तिला एकाच वेळी घर संपवायचं होतं मात्र नवरा यातून कसाबसा निसटला आहे. घटनेत दुर्योधन बाबासाहेब मिंडे हे गंभीर जखमी झाले आहेत
तसेच दोन वर्षाची पियू दुर्योधन मिंडे व दोन वर्षाचा शंभू दुर्योधन मिंडे या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला. या दोघांचाही गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. दुर्योधन यांची पत्नी कोमल दुर्योधन मिंडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत कारण अजून पुढे आले नसून पोलीस तपास करत आहेत.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. स्वामी चिंचोली येथील शिंदे वस्ती येथे हा प्रकार घडला. अगोदर एका खोलीमध्ये नेऊन दोन्ही मुलांचा गाळा दाबून खून केला. नंतर तिला पतीलाही संपवायचं होतं. यातूनच ही घटना समोर आली आहे.
त्यानंतर धारदार शस्त्राने दुर्योधन याच्यावर वार केले. यामध्ये मानेवर व डोक्यावर वार झाल्याने दुर्योधन हे गंभीर जखमी झाले. पत्नीनेच घर संपवण्याच्या केलेल्या या कृतीने सारे जण हादरून गेले आहेत. पतीवर सध्या बारामतीत उपचार सुरू आहेत.