धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, माजी आमदाराने केला ‘हा’ मोठा आरोप, उडाली खळबळ..

धुळे : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱ्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. धुळे जिल्ह्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात खोली क्रमांक १०२ मध्ये तब्बल १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांची रोकड सापडली आहे.
ही रोकड गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत मोजण्यात आली आणि त्यानंतर खोली सील करण्यात आली. या प्रकरणामुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, ही रक्कम विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्य आमदारांना देण्यासाठी जमा करण्यात आली होती. गोटे यांनी यासंबंधी थेट जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विभागीय आयुक्तांशी संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी केली.
त्यांच्या लक्षवेधी भूमिकेमुळे प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आणि चौकशी सुरू झाली. अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपानुसार, विधिमंडळ अंदाज समितीच्या ११ आमदारांच्या दौऱ्यासाठी एकूण ५ कोटी रुपये देण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. यातील काही रक्कम गुलमोहर विश्रामगृहात ठेवण्यात आली होती. गोटे स्वतः त्या खोलीबाहेर बसून कारवाई होईपर्यंत उपस्थित राहिले आणि माध्यमांच्या माध्यमातून हा मुद्दा उचलून धरला.
दरम्यान, या प्रकारामुळे सरकार आणि प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यभरात हा मुद्दा राजकीय पातळीवर गाजत असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.