Crime News : ‘मी अजूनही जिवंत आहे’, स्वतःच्याच हत्येप्रकरणी ११ वर्षाच्या मुलाने कोर्टात दिली साक्ष, नेमकं प्रकरण काय?

Crime News : उत्तर प्रदेशात एक विचित्र घटना समोर आली आहे. सुप्रीम कोर्टात एका खूनाच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, एक ११ वर्षांचा मुलगा हजर झाल्याने खळबळ उडाली. कारण याच मुलाच्या हत्या प्रकरणात कोर्टात सुनावणी सुरु होती. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला.
जेव्हा पिलीभीत येथील ११ वर्षीय मुलाच्या खून प्रकरणी खंडपीठासमोर सुनावणी सुरु असतानाच सदर मुलगाच न्यायालयात हजर झाला. त्याने न्यायमूर्तींने सांगितले की, त्याच्या खूनाबाबत सुरु असलेला खटला खोटा आहे. कारण तो जिवंत आहे. त्याचा खून झालेलाच नाही. मुलाने असाही दावा केला की त्याचे आजोबा आणि काकांना त्याच्या वडिलांनी त्याच्या खूनाच्या प्रकरणात विनाकारण गोवले आहे.
या सगळ्या प्रकारानंतर कोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत याचिकाकर्त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या वर्षी होणार आहे. Crime News
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार, पीलीभीतचे पोलीस अधिक्षक आणि न्यूरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना नोटीसही बजावली आहे. या प्रकरणाशी संबंधित घटना क्रमवार खुलासा करताना, याचिकाकर्त्याचे वकील कुलदीप जोहरी यांनी सांगितले की, मृत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी मुलाला न्यायालयात जावे लागले. मुलगा फेब्रुवारी २०१३ पासून शेतकरी असलेल्या त्याच्या आजोबांसोबत राहत होता.
मुलाच्या आईला त्याच्या वडिलांनी बेदम मारहाण केली होती. मुलाच्या वडिलांना पत्नीच्या कुटुंबाकडून आणखी हुंडा हवा होता. त्यामुळे तिला मारहाण केली जात होती असा आरोप आहे.
वकिलांनी दिलेल्या माहिती नुसार , पतीने केलेल्या मारहाणीमुळे मुलाची आई गंभीर जखमी झाली होती. फेब्रुवारी २०२१० मध्ये त्यांचे लग्न झाले होते. तीन वर्षांनंतर, मार्च २०२३ मध्ये, तिला मारहाणीमुळे दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतर, आजोबांनी त्यांच्या जावयावर भादवि कलम ३०४-ब अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर जावयाने त्याच्या मुलाच्या ताब्यात देण्याची मागणी सासऱ्याने केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली. या भांडणामुळे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान, २०२३ च्या सुरुवातीला जावयाने आपल्या सासऱ्यावर आणि त्याच्या चार मुलांवर नातवाची हत्या केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ३०२ (हत्या), ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी आधी अलाहाबाद कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र तिथे याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यामुळे मुलगा जीवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला सुप्रीम कोर्टात यावं लागले. दरम्यान, या प्रकरणावर आता पुढील वर्षी जानेवारीत सुनावणी होणार आहे.