Pune Crime : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ४८ तासात गुन्हे शाखेकडून बेड्या, ४ लॅपटॉपही केले जप्त..

पुणे : लोखंडी पान्याच्या सहाय्याने ऑफिसचे दार तोडून ऑफिसमधील चार लॅपटॉप चोरून नेणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ४८ तासात बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.
मंगेश विजय चव्हाण (वय. २६, रा. एस.एम.जोशी हॉल जवळ, दारुवाला पुल चौक, रास्ता पेठ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
ही कारवाई दारुवाला पुल चौकात करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा प्रकार ४ ऑगस्ट रोजी मॉडेल कॉलनी येथे घडला होता.
मिळालेल्या माहिती नुसार, दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपीच्या फोटोवरुन तपास करत असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना माहिती मिळाली की, सीसीटीव्ही मधील संशयित व्यक्ती सारखा दिसणारा एकजण दारुवाला पुल चौकातील सार्वजनिक शौचालयाजवळ थांबला आहे.
पथकाने त्याठिकाणी जाऊन संशयीत आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली. आरोपीकडून ३४ हजार रुपये किमतीचे चार लॅपटॉप जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला शिवाजनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.