क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ? गेल्या वर्षी झालेल्या विनयभंगाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश
मुंबई : आयपीएल स्पर्धा सुरु असताना पृथ्वी शॉ आपल्या फॉर्मसाठी धडपडत आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षी झालेल्या विनयभंगाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पृथ्वी शॉ आणि भोजपुरी अभिनेत्री सपना गिल यांच्यात गेल्या वर्षी सेल्फीवरून वाद झाला होता. पृथ्वी शॉने सपनाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. तर सपनाने पृथ्वी शॉविरुद्ध विनयभंगाचा आरोप केला होता. पोलिसांना शॉ विरुद्ध काहीही सापडले नाही. त्यानंतर सपना गिलने महादंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये पृथ्वी शॉ त्याच्या मित्रासोबत हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी सपनाने पृथ्वीसोबत सेल्फी काढला.वारंवार सेल्फी घेतल्याने नाराज झालेल्या शॉ याने हॉटेल व्यवस्थापकाला बाहेर काढण्यास सांगितले होते. काहीवेळाने जेव्हा पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र कारमध्ये बसले तेव्हा सपना गिलने हॉकी स्टिकने त्यांच्या कारवर हल्ला केला. यात पृथ्वीच्या गाडीची काच सुद्धा फुटली तसेच पृथ्वीला देखील सपनाने मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणानंतर पृथ्वी शॉने सपना आणि तिच्या मित्रांवर आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करत पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केली होती.
पोलिसांनी सपना आणि तिच्या मित्रांना गजाआड केले होते. परंतु काही दिवसांनी तिची जामिनावर सुटका करण्यात आली. यानंतर सपनाने देखील जवळच्या पोलीस स्थानकात जाऊन पृथ्वी शॉ विरुद्ध तक्रार दाखल केली. ज्यात तिने पृथ्वीने आपला विनयभंग केल्याचा आरोप केला होता. परंतू त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने तिने मॅजिस्ट्रेट कोर्टाचा आसरा घेतला होता. या प्रकरणी न्यायालयाने आता पृथ्वी शॉविरुद्ध सपना गिलच्या विनयभंगाच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
दरम्यान, महानगर दंडाधिकारी एस. सी. तायडे यांनी पोलिसांना १९ जूनपर्यंत तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पृथ्वी शॉ आणि इतरांविरुद्ध एफआयआर न नोंदवल्याबद्दल पोलिसांवर कारवाई करण्याची गिलची याचिका न्यायालयाने मात्र फेटाळली आहे.