बीडच्या एल्गार मोर्चापूर्वीच ओबीसी ऐक्याला तडा?, मंत्री भुजबळांना धक्का, नेमकं घडतंय काय?

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीच्या शासन परिपत्रकाच्या विरोधात आज बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मोर्चापूर्वीच ओबीसी नेतृत्वामधील मतभेद उघड झाले आहेत.

मंत्री छगन भुजबळ या मोर्चाचे नेतृत्व करत असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी या मोर्चापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ओबीसींच्या एकत्रित लढ्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी बीडच्या मोर्चाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. २ सप्टेंबरच्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागलेला नाही, त्यामुळे आजच्या मोर्चाच्या मागणीशी मी सहमत नाही, असे सांगत त्यांनी या मोर्चाला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले. आपल्याला या मोर्चाचे निमंत्रणही नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तायवाडे यांनी आयोजकांना ओबीसी समाजाची दिशाभूल होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, नोंदी नसलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही आणि २ सप्टेंबरच्या जीआरमध्ये केवळ प्रमाणपत्र देण्याची पद्धत सांगितली आहे, थेट मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. आमच्या ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत. भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही सर्वजण एका मंचावर येऊ,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दुसरीकडे, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि प्रमुख ओबीसी नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे देखील आज बीड येथील सभेला जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मतदारसंघात पूर्वनियोजित दौरा असल्याने ते या मोर्चाला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. मात्र, यामागे राजकीय कारणे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
