दुःखद! नातेवाईकाच्या दहाव्यासाठी निघालेले दाम्पत्य अपघातात ठार; पुण्यातील कात्रज रस्त्यावरील घटना

पुणे : पुण्यात कात्रज कोंढवा रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (ता.११ ) सकाळी इस्कॉन मंदिरासमोर असणाऱ्या चौकाजवळील आरएमडी शाळेजवळ झाला.
ज्ञानेश्वर वाल्मिक लवांडे (वय ५०, रा. बाणेर गाव, पुणे) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय ४५) असे अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, हे दाम्पत्य एका नातेवाईकाच्या उत्तरकार्यासाठी बाणेरवरून कोथळे पुरंदरकडे निघाले होते. तेव्हा इस्कॉन मंदिरासमोरील चौकात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानतंर घटनास्थळी कोंढवा पोलिस दाखल झाले. अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत .